शून्यातून विश्व निर्माण करणारे पाथर्डी चे सुपुत्र राजेंद्र एडके

१ जून १९६८ रोजी, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावात बबन एडके व त्यांची पत्नी भामाबाई एडके या दाम्पत्यांच्या पोटी राजेंद्र एडके यांचा जन्म झाला. एकूण सहा भाऊ व दोन बहिणी असे आठ भावंडे असलेले हे मोठे कुटुंब. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तुटपुंज्या शेतीमध्ये आई वडील राबराब राबायचे. राजेंद्र हा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा. तसं पाहिलं तर पाथर्डीला नेहमीच दुष्काळ! पावसाळ्यात पाऊस पडेल तेवढीच पाण्याची सोय.ना पाटाचं पाणी ना इतर सुविधा. पानकाळात जी शेती पिके तेवढीच काय ती शेती! इतर वेळी नुसता दुष्काळच; मग इतर कामं मिळत नव्हते. 
अशा परिस्थितीत देखील आपल्या आठ आपत्त्यांचा सांभाळा त्यांचे आई-वडील करत होते. राजेंद्र हे शाळेत जाऊ लागले. त्यांची बुद्धिमत्ता खूप चांगली होती. ते एक हुशार विद्यार्थी होते. शिकण्याची त्यांना खूप आवड होती. त्यांच्या घरच्यांनाही त्यांना शिकवण्याची इच्छा होती. परंतु घरच्या गरिबीमुळे इच्छा असूनही त्यांच्या आई-वडिलांना त्यांना पुढील शिक्षण देता आले नाही. इयत्ता चौथी मधूनच त्यांना शाळा सोडावी लागली. एवढ्या लहान वयात ते घरी शेतकामात मदत करू लागले; म्हणतात ना "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी!" तसेच हे एक रत्न जन्मले होते. घरी आई-वडिलांना कामात मदत करायची, शेतात पडेल ते काम करायचे असा त्यांचा दिनक्रम होता.एक एक वर्षे पुढे सरकत होते. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत घरी काबाडकष्ट केले; परंतु पाथर्डीत दुष्काळी तालुका! पान काळात जेवढे पिकेल तेवढीच शेती. इतर ऋतूत पाणी नसल्याने शेतकरी उत्पन्न घेत नसे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा कसा चालणार ह्या विचाराने वयाच्या चौदाव्या वर्षी राजेंद्र एडकेंनी नाशिकला आपल्या काकांकडे कामाला जाण्याचे ठरवले. राजेंद्र एडके यांचे काका नाशिकला बांधकाम व्यवसायात कार्यरत होते. काकांकडे जाऊन बांधकाम क्षेत्रातील गवंडीकाम शिकावे किंवा इतर काही तरी छोटे-मोठे काम शिकून घराला हातभार लावावा; या विचाराने राजेंद्र एडके कामासाठी नाशिकला गेले. तेथे त्यांनी काकांच्या हाताखाली कामाला सुरुवात केली. हळू हळू काम शिकू लागले. खूप कष्ट करू लागले. सोबत नेहमीची गरिबी होतीच! त्यातूनही वेळप्रसंगी रस्त्याच्या कडेला राहून, पत्र्याच्या शेडमध्ये काही वर्ष राहून, एक वेळेस जेवण करून, भरपूर काबाडकष्ट करून त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये हातखंडा मिळवला. व काका बरोबर स्वतःची कामे घ्यायला सुरवात केली.तब्बल दहा वर्षे त्यांनी नाशिकला काम केले. या दहा वर्षांमध्ये त्यांनी खूप चांगली कामे केली. स्वतःचे नाव कमावले. व स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यातूनच त्यांना पुण्यामध्ये काही कामे मिळायला लागली.  वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते पुण्यात आले. त्यांनी पुण्यात बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. पुण्यातही त्यांनी आपली ही ओळख कायम ठेवली व नेहमीच दर्जेदार कामे ते करत राहिले.  त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणखीन कामे मिळतच गेली. काम करून त्यातील पैसे घरी द्यावे लागायचे. घरचा घरखर्च, बहिणींची लग्न अशा जबाबदाऱ्या त्यांनाच पार पाडायच्या होत्या. कारण, बाकीचे त्यांचे भावंडे बेरोजगार होते. आपल्या भावांना देखील काहीतरी कामाला लावले पाहिजे! तसेही पुण्यात काम करून पैसे शिल्लक राहत नव्हते.पाथर्डीला जर आपण कामं सुरू केली तर आपल्या भावांना तसेच इतर बेरोजगारांना रोजगार देऊ शकतो; या विचाराने शेवटी वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी पाथर्डी ला येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. व्यवसायात प्रगती करण्याचा निर्णय घेऊन ते पाथर्डीला आले. पाथर्डीत त्यांनी बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. आपल्या भावांना हाताशी धरले, त्यांच्या मदतीने त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रगती सुरू केली. त्यामुळे त्यांच्या बेरोजगार भावांना रोजगार मिळाला व त्यांचा बांधकाम व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. एकंदर घराची भरभराट सुरू झाली. मग व्याप वाढला तसा कामगारांची संख्या वाढली. अनेक तरुण त्यांच्याकडे काम शिकून स्वतःचा व्यवसाय करू लागले. रोजगार मिळाल्यामुळे त्यांची पुढील पिढी शिकू लागली. एडके यांनीही अनेक गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. अनेक गरिबांच्या मुलांना त्यांनी शिकविले मोठे केले. अनेक गरिबांच्या मुलींच्या लग्नात लागेल ती मदत केली. कन्यादान केले. अनेक गावांच्या मंदीरांच्या  बांधकामासाठी हातभार लावला. गावाकडील प्रचंड दुष्काळ, शेतकऱ्यांना साथ  कोणाची तर झाडांची वृक्षांची असा मंत्र जोपासत त्यांनी वृक्षारोपण केले. अन्नदान तर त्यांचे नेहमीचेच कार्य. ते नेहमीच अन्नछत्र भरवतात. आज पाथर्डी मधील ७५ टक्के बांधकामे त्यांनी केली आहेत. पाथर्डी मधील अनाथाश्रमातील मुलांना ते नेहमीच आधार बनून राहिले आहे. तेथील गोशाळेतील गोमातांना त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे. इयत्ता चौथीतून शाळा सोडलेले ही व्यक्ती क्षणाक्षणाला शिकत  गेली आणि अनुभवाच्या शिदोरीवर स्वतः बांधकाम क्षेत्रात एक अस्तित्व निर्माण केलं. कारण अनुभवाची शिदोरी आयुष्यभर पुरणारी असते. लाथ मारीन तिथे पाणी काढण्याच्या वयात त्यांनी ते करून दाखवलं. त्यांचा मुलगा नितीन हा देखील त्यांच्या बांधकाम व्यवसायात त्यांना मदत करत आहे. त्यांचा दुसरा मुलगा गणेश हा भारतीय नौसेनेत अधिकारी असून अहोरात्र भारतमातेची सेवा करत आहे. नितीन एडके याने आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केल्यापासून २०१५ पर्यंत मजुरीवर काम घेणारे त्यांच्या वडिलांनी नितीन च्या साहाय्याने २०१५-१६ साली त्यांनी राजेंद्र कन्स्ट्रक्शन ही  स्वतःची बांधकाम व्यवसायातील एक फर्म सुरू केली. आज पुण्यात देखील त्यांची  कामे चालू आहेत. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिलेला आहे. याचबरोबर नीतीनने २०१८ मध्ये ए.एन. ग्रुप ऑफ इंडस्ट्री ही स्टील कंपनी पिंपरी चिंचवड येथे सुरू केली आहे. एकंदर आपल्या मुलांची साथ भेटल्यानंतर राजेंद्र एडके यांच्या व्यवसाय अजून भरभराटीस लागला आहे. त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी ज्याप्रमाणे साथ दिली; अगदी त्याप्रमाणेच त्यांचे नितीन व गणेश हे दोन मुले त्यांना साथ देत आहेत. म्हणतात ना, "जसे पेराल तसे उगवते!" शाळेत मौजमजा करण्याच्या वयात त्यांनी केलेले काबाड कष्टाचीच ही  परिणीती आहे. अनेक लोक येतात आणि नितीनला  सांगतात, की तुझ्या वडिलांमुळेच माझा मुलगा मुलगी शिकली! असा ऐकल्यानंतर नितीनला वडीलांचा खूप अभिमान वाटतो. कितीतरी सामाजिक कार्य त्यांनी केले, परंतु त्याची कधीच जाहिरातबाजी त्यांनी केली नाही. कसलाही बडेजाव मिरवला नाही. कसलीही अपेक्षा न करनं व हिताची कामे करत राहणे हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य वैशिष्ट्य ठरते. अशा शून्यातून विश्व निर्माण करणारे पाथर्डी चे सुपुत्र राजेंद्र बबन एडके  यांना खरा सामना परिवाराकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!