बीजोत्पादन करताना महत्वाच्या बाबी..

भाजीपाला बियाणेनिर्मितीसाठी वातावरणानुसार बीजोत्पादन कार्यक्रम घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामानाचा बियाणे निर्मितीवर खूप मोठा परिणाम दिसून येतो. हवामानामध्ये प्रामुख्याने प्रकाश (कालावधी, तीव्रता), तापमान,पाऊस, हवा यांचा बीजोत्पादनावर परिणाम होतो. पीक जमीन भाजीपाला बीजोत्पादनासाठी अधिक चांगली मानवते. जमिनीचा सामू प्रामुख्याने भाजीपाला व शेंग वर्गीय पिकांवर जास्त परिणाम करतो. मुख्यत्वे क्षारयुक्त तसेच आम्लयुक्त जमिनीमध्ये भाजीपाला बीजोत्पादन घेणे टाळावे. ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे व पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये.
अनुकूलता ▪ ज्या हवामानाला जे पीक होते तेच पीक दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो व बियाण्याची प्रत उत्तम मिळते.
थंडी ▪ जर समशीतोष्ण भागात थंडी १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाली, तर बियाणे पक्व होण्यास उशीर होतो. बियाणे चांगल्या प्रकारे भरत नाही.
हवा ▪ कमी प्रमाणात हवेचा वेग असेल तर कांदा, कोबी, फ्लॉवर यांसारख्या पिकांमध्ये परागीभवनासाठी फायदेशीर ठरते. कोरडी हवा फुलोऱ्याच्या वेळेस जास्त प्रमाणात असेल तर परागीभवनावर परिणाम दिसून येतो.
तापमान  ▪पिकाच्या फुलोरा अवस्थेत जर तापमान अधिक असेल, तर परागीभवन व फळधारणा होण्यावर परिणाम दिसून येतो. प्रामुख्याने टोमॅटो व मिरची या पिकांवर अधिक परिणाम दिसून येतो. अधिक तापमानामुळे बियाण्याची वाढ नीट होत नाही व गुणवत्ता कमी होते. तापमान ३८ अंश सेल्सिअस च्या वर गेले तर बीजोत्पादन कमी होते.
आर्द्रता  ▪जर वातावरणात आर्द्रता अधिक असेल, तर शेंगवर्गीय पिकांमध्ये फूलगळ दिसून येते. तसेच जर वातावरणीय आर्द्रता ४० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर बियाणे टणक होते. त्यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम दिसून येतो, त्याचबरोबर रोपे मरतात. वातावरणामध्ये जर आर्द्रता व तापमान अधिक असेल तर रोगांचे प्रमाण अधिक आढळून येते. अंशतः गरम व कोरडे हवामान भाजीपाला बियाणे निर्मितीसाठी अत्यंत लाभदायी ठरते.
पाऊस ▪ अधिक पावसामुळे परागीभवनावर परिणाम दिसून येतो. किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसून बियाणे उशिरा पक्व होते.
किडींचा प्रार्दुभाव  ▪ भाजीपाला बियाणे निर्मितीसाठी काही मित्र कीटक परागीभवनासाठी फायदेशीर ठरतात, तर काही किडी मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची गुणवत्ता व शुद्धता बिघडवतात. यामध्ये प्रामुख्याने पर-परागीभवन पद्धतीने ज्या पिकांमध्ये बियाणेनिर्मिती होते अशा पिकांची किडींमुळे शुद्धता बिघडते.
उत्पादन पद्धती ▪बियाण्याची संपूर्ण माहिती पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती ठेवावी. प्रामुख्याने लागवडीचा हंगाम, किडी व रोगांचा विशेष प्रादुर्भाव बियाणे लागवड आणि काढणीची तारीख इत्यादी संबंधित काही विशेष नोंदी ठेवाव्यात. भविष्यात बियाण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास उदा. उगवणक्षमता आर्द्रता प्रमाणित केल्यापेक्षा कमी उगवणक्षमता आढळली, तर बियाण्याचा संपूर्ण विलगीकरण अंतर भाजीपाला बियाणेनिर्मितीसाठी पीक निहाय विलगीकरण अंतर राखणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे बियाण्याची शुद्धता राखण्यास मदत होते.


प्रा.हरिष अ. फरकाडे
सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविध्यालय अमरावती.